स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विकता का उत्तर’ हा कार्यक्रम दिवसेंदिवस रंगात येत असून त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.. दर शुक्रवार ते रविवार सायंकाळी ७.३० च्या सुमारास ‘विकता का उत्तर?...’ ही रितेश देशमुखची साद संपूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरातून ऐकू येते. प्रश्नोत्तराच्या या खेळात सामान्यांना सेलिब्रिटी बनवणा-या या क्वीजशोचे या आठवड्यातले एपिसोडदेखील असेच रंजक आणि धम्माल असणारे आहेत. आतापर्यत प्रश्नाच्या उत्तरासाठी स्पर्धकांना ट्रेडर्सकडे उत्तर विकण्यासाठी भाव करावा लागत होता, पण यंदाच्या एपिसोड मध्ये खुद्द ट्रेडर्स उत्तर विकण्यासाठी स्पर्धकाकडे भाव करताना दिसून येतील.
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या वासिम महमूद पठाण यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक प्रश्नाची अचूक उत्तर देत,ट्रेडर्सना देखील अचंबित केले. विकता का उत्तरच्या सेटवर त्यांना विचारण्यात आलेल्या एकूण १० प्रश्नामध्ये डॉक्टर साहेबांनी केवळ तीनदाच ट्रेडर्सची मदत घेतली. डॉक्टर साहेब कधी कोणत्या प्रश्नाला अडतायत आणि आम्ही त्यांच्या बटव्यातले पैसे घेतोय, याची वाटच जणू सर्व ट्रेडर्स मंडळी पाहताना दिसून आले. मात्र, हुशार डॉक्टरांनी देखील क्लुप्त्या लढवत ट्रेडर्सनाच उत्तर खरेदी करण्यास भाग पाडले. त्याच्या या खेळाला दाद म्हणून शोच्या उत्तरार्धात ट्रेडर्सनी पठाण यांना स्टँन्डिंग ओवेशन देखील दिले. आत्मविश्वास आणि भाव करण्याची कुशाग्र कला असणा-या वासिम पठाण यांनी खेळलेला ट्रेडर्स सोबतचा हा सापशिडीचा डाव रसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. ‘विकता का उत्तर’च्या सेटवर स्पर्धक बनून आलेल्या या डॉक्टरची ६० ट्रेडर्ससोबत कशी जुंपली, हे या आठवड्यात पाहता येईल.
बुलढाण्याच्या पोलीस नाईक अनिता वारांगणे यांचा इमोशनल एपिसोड हाही या आठवड्यातला महत्वाचा भाग असेल, पोलीस खात्याच्या जबाबदारीसोबतच कौटुंबिक जबाबदारी लीलया पेलणा-या या महिलेच्या आयुष्यातल्या गुंत्यात रितेश देशमुख यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून केलेलं मार्गदर्शन हा एकंदर एपिसोड भावनिक बनवून गेला.मनोरंजनासोबतच रिएलिटी शो मध्ये नात्यांचा हळवा कोपरा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे