मराठी नाटकांना फार मोठी परंपरा लाभली आहे. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, विनोदी, फार्स, रहस्यमय अशा वैविध्यपूर्ण नाटकांनी रंगभूमी समृद्ध केली. या समृद्ध मराठी रंगभूमीवर काळानुरूप, प्रेक्षकांच्या वयोगटानुसार तसेच अभिरुचीनुसारही येणाऱ्या नाटकांचे प्रकार व सादर करण्याचे प्रकार सतत बदलत राहिले. नवे लेखक, दिग्दर्शक, कलाकार येथे घडत गेले. याच पार्श्वभूमीवर काहीतरी चांगले देण्याच्या हेतूने किशोर सावंत यांनी अभिनयासोबत नाट्य निर्मितीत प्रवेश करीत ‘किशोर थिएटर्स’चा तीन वर्षांपूर्वी शुभारंभ केला. किशोर सावंत यांनी १९८० सालापासून नाटक, एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. बी.कॉम, एम.बी.ए फायनान्समध्ये शिक्षण घेतल्यावर पुढे करिअरच्या व्यापात अभिनयाच्या आवडीला वेळ देता आला नाही. सध्या नामांकित फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये बड्या हुद्द्यावर ते कार्यरत असून त्यांनी आपली आवड जपण्यासाठी व सामाजिक जाणिवेचे भान ठेवून उत्तम कलाकृती निर्माण करण्याच्या हेतूने ‘किशोर थिएटर्स’ची स्थापना केली.
‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण
१९९७ मध्ये विलास गुर्जर यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे १९६४ साली रंगमंचावर आलेलं नाटक किशोर सावंत यांनी त्यांच्या ‘किशोर थिएटर्स’ संस्थेतर्फे ५ दशकांनंतर नव्या संचात रंगमंचावर आणलं. या नाटकाचे आतापर्यंत ६० यशस्वी प्रयोग सादर झाले असून त्यांची ही घौडदोड नेटाने सुरु आहे. अलीकडेच सादर झालेल्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’च्या ५० व्या प्रयोगाला नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बाळ कोल्हटकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या नाटकाचे नव्या संचातील दिग्दर्शन विजय गोखले यांनी केलंय. यात किशोर सावंत यांनी बाबासाहेब देवधर ही व्यक्तीरेखा साकारली आहे. व्यावसायिक रंगभूमीवर अभिनय करण्याचे धडे त्यांनी विजय गोखले यांच्या तालमीत गिरविले असून रंगमंचावरचा वावर, देहबोली, संवादफेक असे अभिनयाचे बारकावे त्यांच्याकडूनच आत्मसात केल्याचे किशोर सावंत आवर्जून सांगतात.
अभिनेता -निर्माता किशोर सावंत यांच्याप्रमाणेच विवेक नाईक हे कुवेत स्थित त्यांचे मित्र नोकरीनिमित्त परदेशी राहून तेथील महाराष्ट्र मंडळात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होत आपली सांस्कृतिक आवड जोपासून आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून विवेक नाईक देखील नाटक, एकांकिकांमध्ये काम करीत आहेत. कलेच्या क्षेत्रात भरीव आणि चांगले काहीतरी करावे या हेतूने किशोर सावंत आणि विवेक नाईक या दोन मित्रांनी एकत्र येत ‘किवि प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या संस्थेतर्फे त्यांनी ‘करायला गेलो एक’ या गाजलेल्या फार्सिकल विनोदी नाटकाची नव्या संचात निर्मिती केली. बाबुराव गोखले लिखित या नाटकाचेही दिग्दर्शन विजय गोखले यांनीच केलंय. त्यांच्या या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु कलाकारांचं व्यस्त वेळापत्रक व व्यावहारिक गणित न जुळल्याने यशस्वी २५ प्रयोगानंतर त्यांनी हे नाटक नाईलाजाने थांबविण्याचा निर्णय घेतला. किशोर सावंत यांनी या नाटकात बातमीदार ‘शंखनाद’ ही व्यक्तिरेखा उत्तम रंगवली होती.
‘किवि प्रॉडक्शन्स’ची आगामी निर्मिती ‘अपराध मीच केला’
‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ व ‘करायला गेलो एक’ या दोन यशस्वी नाटकांनंतर किशोर सावंत आता विवेक नाईक यांच्या साथीने ‘अपराध मीच केला’ हे गाजलेलं सलग तिसरे नाटक प्रेक्षकांसाठी घेऊन येताहेत. मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं हे नाटक त्याकाळी तुफान गाजलं होतं. ‘अपराध मीच केला’या नाटकाचेही दिग्दर्शन विजय गोखलेच करणार आहेत. ‘किवि प्रॉडक्शन्स’च्या या नाटकात आजचे आघाडीचे कलाकार रमेश भाटकर यांच्यासोबत विजय गोखले, विघ्नेश जोशी, यश जोशी आणि स्वतः किशोर सावंत काम करणार आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात हे नाटक रंगमंचावर आणण्याचा त्यांचा मानस आहे.
‘किवि प्रॉडक्शन्स’च्या माध्यमातून किशोर सावंत व विवेक नाईक यांचे भविष्यात नवीन नाटकांसोबतच मालिका व चित्रपट निर्मितीत उतरण्याचे देखील स्वप्न आहे. ‘किवि प्रॉडक्शन्स’ निर्मित‘अपराध मीच केला’ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभेल असा त्यांना विश्वास आहे.