एम.यू.पी बॅंकेत झाला हास्याचा दिवाळी महाबोनस

महिलांची हक्काची बॅंक अशी अल्पावधीतच ओळख बनवणाऱ्या एम.यू.पी. बॅंकेत सध्या उत्साहाचे वातावरण आहे. काही दिवसावर येऊन ठेपलेल्या दिवाळसणानिमित्ताने या बॅंकेतील सर्व कर्मचाऱ्यांना आगळावेगळा महाबोनस मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ग सहाजणी' या मालिकेतील मंजुळाबाई उसने परतफेड बॅंकेने नुकताच हास्याचा दिवाळी महाबोनस जाहीर केला. 
महिलांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेतील  कामिनी, मीना, दामिनी, सुश्मिता, भीमा आणि जुबेदा या सहा मैत्रिणींनी मिळालेलया हास्याच्या या महाबोनसचा मनसोक्त आनंद लुटला. बॅंकेच्या गेटटुगेदर पार्टीत रंगलेल्या महिलांच्या विविध स्पर्धेत या सहाजणींनी पुरेपूर बक्षिसाची लयलूट केली. इतकेच नव्हे तर, बॅंकेचे खडूस मॅनेजर धबडगावकर वर्सेस 'गं सहाजणी' अशी चुरशीची स्पर्धा देखील यात रंगली. 
प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 'ग सहाजणी' च्या या दिवाळी स्पेशल एपिसोडचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. 'ग सहाजणी' चा हा एपिसोड दिवाळी धम्माल गाजवणारा असल्यामुळे चित्रीकरणासाठी बॅंकेची सुंदर सजावट करण्यात आली होती. दिवाळीला घराची ज्यापद्धतीने महिला सजावट करतात तशीच सजावट एम.यू.पी बॅंकेत या सहाजणींनी मिळून केली होती. नोकरी करणाऱ्या महिलांचे ऑफिस हे देखील एक कुटुंब असते, त्यामुळे आपल्या ऑफिसची झाडलोट आणि सजावट करण्यासाठी या सहाजणींनी कंबर कसली होती. बॅंकेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी, तोरण, प्रकाशदिवे, कंदील आणि पणत्यांची आरास करत त्यांनी खऱ्या अर्थाने दिवाळसण साजरा केला. 
एका बँकेत काम करणाऱ्या सहाजणींची गोष्ट सांगणारी ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी झाली आहे. या मालिकेतील शर्वणी पिल्लई (मीना मोडक), नियती राजवाडे(दामिनी), नम्रता आवटे (जुबेदा), पोर्णिमा अहिरे(भीमा), सुरभी भावे (सुश्मिता) आणि मौसमी तोडवळकर (कामिनी) या प्रमुख  अभिनेत्रींनीं आपापल्या भूमिकेतून 'गं सहाजणी'त रंग भरला आहे.  दिवाळी सणानिमित्त महिलावर्गात होणारी चर्चा, नट्टापट्टा, शॉपिंग तसेच रांगोळी... ! असे बरेच काही या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच नेहमीच दराऱ्याखाली आणि आपल्या मर्जीत ठेवणाऱ्या धबडगावकरांची या सहाजणी दिवाळी स्पेशल भागात कशी फजिती करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Subscribe to receive free email updates: